motivational blog

HOW TO LEARN SHARE MARKET?

फक्त भरपूर पुस्तके वाचून शेअर बाजार शिकता येणार नाही …

जसे सायकल कशी चालवावी हे पुस्तके वाचून शिकता येत नाही तसेच फक्त पुस्तके वाचून शेअर बाजार शिकता येणार नाही कारण त्यासाठी व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. भारतीय शेअर बाजार आणि एकंदरीत शेअर बाजार या विषयावर अनेक पुस्तके आहेत ती वाचत असताना माणसाने स्वतःला वाचायला म्हणजे स्वतःची मानसिकता समजून घेणे आहे जी पहिली पायरी आहे.

वेगवेगळी पुस्तके वाचली तर तयार आकडेवारीचे विश्लेषण कसे करावे याबाबत माहिती दिलेली असते जी वेगवेगळ्या शब्दात मांडलेली असली तरी त्याचे सार साधारणपणे एकच असते. पण मूलतः आपली मानसिकताच शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी योग्य आहे का हे आधी जाऊन घेणे आवश्यक आहे. आता महागाईचा दर ६%-७% असताना बँकेच्या मुदत ठेवीत ५% व्याजाने ठेव ठेवणारी लोकं असतात तिथे शेअर बाजाराचा विचारच येत नाही.

शेअर बाजार म्हणजे जोखीम आली … म्हणजे ती जोखीम कमी किंवा संतुलित करण्यासाठी अभ्यास करणे आलेच. पण हा अभ्यास म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जाऊन करण्यासारखा अभ्यास नाही तर वाचन, निरीक्षण, विश्लेषण आणि तज्ञांची मते ऐकून त्यातील आपल्याला काय पटते आणि आपल्याला काय मानवते त्याची निवड करणे महत्वाचे आहे.

शेअर बाजारात तुफान पैसे कमावणाऱ्या लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकतो पण एकाने पैसे कमवले असतील तर कदाचित दहाजण याच बाजारात बुडालेलेही असतात त्यांच्या कथा जो पर्यंत वर्तमानपत्रात येत नाही किंवा वाहिन्यांवर सांगितल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्याला माहित नसतात … म्हणून अभ्यास करून निर्णय घेणे जरुरीचे आहे.

पुन्हा संपूर्ण शेअर बाजार म्हणजे काय? अनेक बाजारांपैकी शेअर बाजार हे एक बाजार आहे आणि या अनेक बाजारांचा परस्परांवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे फक्त शेअर बाजाराचा अभ्यास झाला तरीही तो कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. मराठीत एकही पुस्तक असे नाही की जे आग्रहाने सुचवावे पण इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत. सर्वात प्रथम हे पुस्तक वाचा.

आपल्याला इन्व्हेस्टर व्हायचे आहे, का ट्रेडर व्हायचे आहे का स्पेक्युलेटर हे आधी ठरवून घ्या म्हणजे त्या नुसार तुम्हाला अभ्यास करता येईल. अर्थातच एकाच वेळी या सर्व क्षेत्रातही सक्रीय राहणेही शक्य आहे पण त्यासाठी आवश्यक तो वेळ तुम्हाला देता येणार आहे का आणि तेवढा अभ्यास करण्याची तुमची तयारी आहे का याचा अंदाज घ्या.

शक्यतो इन्व्हेस्टमेंट पासून सुरवात करा आणि मग ट्रेडिंगकडे जा कारण तिथे जरी उत्पन्न जास्त असले तरीही जोखीम प्रचंड आहे … लाखाचे बारा हजार होण्यासाठी एक दिवसही पुरेसा असतो.

Inductive तर्काचा अंगीकार करण्यापेक्षा Deductive तर्काचा अंगीकार करा म्हणजे मार्ग सुलभ होतो. काय करू नये हे एकदा ठरले की काय करायचे हे अधिकाधिक स्पष्ट होत जाते. ज्या क्षेत्रात / उद्योगात तुम्हाला गती आहे अशाच क्षेत्रापासून / उद्योगापासून सुरवात करा. फक्त चांगल्या म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स पासून सुरवात करा आणि अगदी लहान प्रमाणात सुरवात करा आणि जसजसा आत्मविश्वास येत जाईल तशी गुंतवणूक वाढवा. कधीही शेवटच्या पैशापर्यंत गुंतवणूक करू नका आणि फक्त एकाच क्षेत्रात किंवा एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घेऊ नका तर पैसे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या आणि चांगल्या कंपन्यात गुंतवा.

डोक्यावर कर्ज असेल किंवा आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर त्याची तरतूद झाल्यावर मग गुंतवणूक करायला सुरवात करा … शेअर बाजारात कमी काळात भरपूर पैसा मिळवून पटकन श्रीमंत होता येते या भ्रमात राहू नका.

सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजारात स्वतः मोठे विद्वान असल्याचा दावा करणारे मित्र आणि ब्रोकर्स यांच्या पासून कायम सावध रहा … दुसऱ्याच्या अभ्यासावर श्रीमंत होता येत नाही.

शुभेच्छा … !

Leave a comment